संकल्प
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण नेहमीच कुठला न कुठला संकल्प करीत असतो. कधी तब्येतीसाठी तर कधी बचत व्हावी म्हणून कधी यशस्वी होण्यासाठी......वेगवेगळी कारणं असतात. काही संकल्प पूर्ण होतात तर काही पूर्ण करताना दमछाक होते.....अशाच गमतीदार किस्सा घेऊन आज चा हा लेख लिहिण्याचा प्रपंच....वाचा आणि नक्की कळवा कसा वाटला ते.....कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा बरं का? ....
संकल्प
©️ प्राजक्ता ठोंबरे

संकल्प* या शब्दाबद्दल लहानपणी मला फारचं कुतूहल वाटत असे. मला आठवतंय मी कदाचित ३-४ थ्या वर्गात असेन जेव्हा मी हा शब्द पहिल्यांदा ऐकला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना लोक लगोलग हे ही विचारायचे की,
" काय मग काय संकल्प केला तुम्ही नवीन वर्षाचा?" इतकचं नाही तर मी माझ्या आईला पण इतरांना विचारताना पाहिलं आणि ऐकलं होतं की काय संकल्प केला तुम्ही ? सहाजिकच माझ्या बालमनाला या शब्दाबद्दल अधिक कुतूहल वाटले पण या शब्दाचा अर्थ काही कळत नव्हता.
मग एक दिवस मी न रहावून आईला विचारलेच की ,"आई संकल्प म्हणजे काय गं?" तर ती म्हणाली....की एखादी गोष्ट करण्याबाबत किंवा न करण्याबाबत मनाचा निर्धार म्हणजे संकल्प. 😔 आता हे ही कळायला कठीण च. पण माझ्या बालमनानी मात्र या शब्दाचा अर्थ लावून घेतला होता . तो असा की सगळ्या मोठ्या लोकांचा संकल्प एकच असतो ,तो म्हणजे ,"उद्या सकाळी लवकर उठून फिरायला जाणार"......काय आलं नं तुमच्या ही चेहर्यावर हसू? कारण हा संकल्प खरोखरंच गेले कित्येक वर्षे घराघरात केला जातो. अगदी माझ्या आई च्या पिढी पासून थेट माझ्या पिढीच्या ही कितीतरी मैत्रिणी अजूनही हा संकल्प न चुकता दरवर्षी करतात......काही पूर्ण ही करतात.
पण बरेचदा जोमात सुरू झालेला संकल्प कधी जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ,तर कधी आळशीपणामुळे थंडबस्त्यात जातो.
खरंतर कित्येकदा केलेले संकल्प हे संकल्पच राहतात. पण तरीही ते काही तरी शिकवण नक्कीच देऊन जातात.पूर्ण झाले तर मिळणारं समाधानच वेगळं. आणि पूर्ण न झालेले संकल्प ही बरेच काही शिकवून जातात.उदाहरणार्थ : लहानपणी पाढे पाठ करण्याचा संकल्प पूर्ण केला म्हणून आता हिशेब चटपट करता येतो , किंवा मी रोज गृहपाठ पूर्ण करीन असा संकल्प केला असता तो जर मोडला तर मनाला सारखी हूरहूर लागत असे. आईने वारंवार सांगून मनावर बिंबवले होते की कधीही खोटं बोलायचं नाही.....हा तिने केलेला बालमनावरील संस्कार मनात इतका खोलवर रूजला की तो आपसूकच एक संकल्प झाला.
काही संकल्प पूर्ण करतांना मात्र खूप गमती जमती घडतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी म्हण बनवलीय -'नव्याचे नऊ दिवस ' किंवा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' .... आता तुम्हाला प्रश्र्न पडला असणार की या म्हणींचा इथे काय संबंध?' तर मी तुम्हाला माझ्या अलीकडच्या एका संकल्पाबद्ल सांगते.
आता या टाळेबंदी च्या काळात आपण सगळेच काम घरी करत आहोत त्यामुळे सुरुवातीला मी पण ठरवले (संकल्प केला) की कपडे हातानेच धुवायचे. तेवढाच व्यायाम. ठरविल्या प्रमाणे एक महिना केले सुद्धा....पण मग घरचे सतत म्हणायला लागले की मशीन आहे तरी लावत का नाही......मग आमच्या कमलाबाई पण यायला लागल्या. पण माझ्या मुलांचे कपडे मी हाताने च धुवायचे....एक दिवस कंटाळा आला , म्हणून मशीन लावली...मग पुन्हा एक दिवस उशीर झालाय कपडे वाळले पाहिजे म्हणून मशीन लावली..... असं करता करता आता रोज मशीन लावू लागले....नंतर नंतर लक्षात आले की रोज मशीन मधे कपडे लावावे इतके कपडे नसतात.
मग दोन दिवसांचे कपडे जमवून मशीन मधे धुवायला लागले. वाजले ना संकल्पाचे तीन तेरा........याहून मोठी गंमत तर पुढेच आहे. कधी कधी दुसर्या दिवशी कपडे धुवायचा कंटाळा यायला लागला....दुपारची झोप किंवा लिखाणासाठी मिळणारा वेळ भुरळ घालायचा..... ...बोला आता?😃आणि मशीन, आणि मोबाईल मुळे मी किती आळशी झाली आहे हे जाणवायला लागले.....तर अशा या अर्धवट संकल्पामुळे मला लहानपणी च्या सुविचाराची आठवण करुन दिली:-"आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे".
नंतर कळत्या वयात संकल्प या शब्दाचा अजून एक अर्थ कळला की कुठलेही व्रत किंवा धार्मिक विधी करताना आधी संकल्प सोडावा लागतो जेणे करून सर्व व्यवस्थित पार पडून ईच्छित फलप्राप्ती व्हावी.
तर अशा या संकल्पाच्या बाबतीतल्या गमती जमती . गमतीचा भाग सोडला तर संकल्प म्हणजे च संयम असे मला वाटते कारण संकल्प करणे आणि त्या संकल्पाची पूर्ती करणे यात सातत्यपूर्ण कृती हवी असते जी केवळ संयमाने च साध्य होते..........हा लेख एका बैठकीत पूर्ण करण्याचा माझा *संकल्प* मी आता साध्य केला.......... मैत्रिणींनो पुन्हा असाच एखादा भन्नाट विषय घेऊन भेटीला येण्याचा संकल्प करते
तूर्तास निरोप घेते🙏 आणि लेखणी थांबवते.
Bhadiya
ReplyDeleteThank you
Delete