आत्मपरीक्षण

आत्मपरीक्षण

 © प्राजक्ता ठोंबरे

 दिनांक: १६/०६/२०


आजची सकाळ तशी प्रसन्न च झाली. सकाळी पूर्वा ला असीम च्या 'आई' हाकाने च जाग आली. सगळं आटोपून पूर्वा स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाक सुरू करणार तोच कानावर आवाज आला...
'गाडीवाला आया घर से कचरा निकाल, गाडीवाला आया.......' 


पूर्वा ने कचरा बाहेर ठेवला आणि हात धुवून पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. ती काम करता करता च विचार करू लागली की ,....काय कमाल गाणं बनवलं आहे नं....... कुणालाही कचरा बाहेर टाकायला धावत जावसं वाटेल इतकी ऊर्जा आहे या गाण्यात. पण तिच्या विचारांचं तिलाच हसू आलं.


स्वयंपाक करताना विविध विषयांवर मनन करणे हा पूर्वाचा आवडता छंद होता. आणि हा छंद जोपासायला कोणाचीही आडकाठी होत नसल्याने ती फार रमायची......


आता ती विचार करू लागली की खरच किती छान झालं असतं ना जर रोज मनातला कचरा काढता आला असता तर.....?
कितीतरी अनावश्यक गोष्टी जशा घरात वर्षानुवर्षे साठतात तिचं अवस्था मनाचीही असते. एकवेळ घर स्वच्छ होईल पण मनातील मळभ कसा स्वच्छ करणार? 


वायू वेगाने धावणार्या या मनात त्याच वेगाने इतरांबद्दल ईर्षा , मत्सर,चिड,स्वत: बद्दल चा अहंकार निर्माण होतो.... पण त्या वेगाने तो बाहेर नक्कीच पडत नाही..... या उलट अमूक एखाद्या गोष्टीचा / व्यक्ती चा राग आला आणि त्याचा आपण विचार केला तर तो वाढतच जातो...... विचारांच्या तंद्रीत च पूर्वा उभी होती तितक्यात तिच्या सासूबाई जवळ येऊन तिला म्हणाल्या, 'तू कर पोळ्या , मी त्याचा डबा भरते '.त्यांच्या या वाक्याने तिची तंद्री तर तुटलीच, पण तिला हे ही जाणवलं की ज्या सासूबाईंची मदत तिला आधी लुडबुड वाटायची ती मदत आता तिचा आधार झाली होती.....


थोडक्यात काय ? त्याच दोन व्यक्ती आणि नातं ही तेच पण आता पूर्वाचा दृष्टीकोन बदलला होता...... तिला हे जाणवलं की आपण सासूबाईंबद्ल किती चूकीचा विचार केला...., पूर्वा ला हे कळलं कारण तिने मनावर ची धूळ पुसण्याचा, मनातील घाण काढण्याचा काही अंशी प्रयत्न केला. हे झालं फक्त एका नात्याच्या बाबतीत ..... पण पूर्वा च नाही तर आपण ही वेगवेगळ्या ठिकाणी कधी समाजात ,कधी कामाच्या  ठिकाणी असे अनुभव घेत च असतो.


दुसर्यांना आपण कायम आपल्या जागेवरून च बघतो म्हणून हा गोंधळ.... दुसऱ्यांना समजून घेता आलं तर तेच आत्मपरीक्षण समजायचं. कारण जोपर्यंत आपण त्याच्या ठिकाणी स्वत:ला ठेवत नाही तोपर्यंत हे शक्यच नाही.   हे ही एक प्रकारचं आत्मपरीक्षण च फक्त स्वत:ला  दुसर्याच्या  ठिकाणी ठेवून केलेलं.......


 आणि खरं आत्मपरीक्षण : ज्यात स्वत:चार इतरांसोबत चा व्यवहार  (वागणूक) ,स्वत: मधील दोष ,स्वत:चे उत्तम गुण आणि स्वत्वाचा विचार आणि स्वत:चं स्वत: केलेलं मूल्यांकन जे कधीच चुकू शकत नाही. दोन्ही मूल्यांकन महत्त्वाचे...


मला वाटते आत्मपरीक्षण म्हणजे स्वत:ची ओळख स्वत: सोबत नव्याने होणे. स्वत:च्या भौतिक, लौकिक, आणि आध्यात्मिक प्रगती चा मार्ग खुला करून देणे म्हणजे च आत्मपरीक्षण .














Comments